सातआठ वर्षांपासून ज्ञानेश्वरी एकाच जागेवर निश्चल, हतबल पडलेली होती. जिल्ह्यातील साखरखेर्डा गावजवळ एका खेडेगावात ज्ञानेश्वरी अतिशय असहाय्य जीवन जगत होती.

लहानपणी तिची आई वारल्यानंतर ती वयात येताच तिच्या वडीलांनी तिचं लग्न करून दिलं. मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या वडीलांनी स्वतः ही लग्न केलं. लग्नानंतर वर्षभरातच ज्ञानेश्वरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाच्या बाललिलांचा आनंद घेण्याचं भाग्य तिला लाभलं नाही. मूल वाढत होतं आणि ज्ञानेश्वरीचं दुखणही. सुरुवातीला होणाऱ्या त्रासाला न जुमानता ती संसार रेटत होती. हळूहळू तिच्या पायातील शक्ती क्षीण झाली. पहाता पहाता तिच्या मानेपासून खालचा भाग बधीर झाला. तिला शरीराची हालचाल करणे कठीण जात होते. कोणी तिला हालचाल करण्यास मदत केली तर तिला वेदना होत होत्या. घरच्या दारिद्र्याने उपचार करणे दुरापास्त होते. बायकोची अवस्था पाहून तिच्या पाठीशी उभं राहण्याचं सोडून तिचा नवरा तिलाच सोडून गेला. म्हातारे सासू-सासरे नातवाला घेऊन गांव सोडून निघून गेले. आता छोट्याश्या घरात एकटी ज्ञानेश्वरी.

 शेजाऱ्यांना तिची कीव यायची पण त्यांच्याही मर्यादा होत्या. एकवेळ खायला कोणीही देईल पण स्वच्छतेचं काय ? ज्ञानेश्वरीला जीव नकोसा वाटायचा. हातात अगदी थोडस बळ असतांना तीन आजुबाजूला पडलेल्या गोष्टी तोंडात टाकायला सुरुवात केली. कदाचित एखादं विषारी कीडाकिटकूल आपण खाऊ आणि मरून जाऊ असा विचार तिच्या मनात येत होता. काही शेजारणी मोठ्या हिमतीने तिची स्वच्छताही करायच्या पण ज्ञानेश्वरीला खूप संकोच वाटायचा. त्यामुळे अनेकदिवस ती काहीच खात नसे तर कधी दोन दोन दिवस शारीरिक विधीही करीत नसे. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीप्रमाणे अमक्याने तिला जेवण दिलं असेल, तमक्याने पाणी पाजलं असेल असा विचार करून शेजारी निश्चिंत रहात असतं. एकीकडे ज्ञानेश्वरी दररोज मरणाचे उपाय शोधत असतांना नियती तिला जीवंत ठेवण्यात कसूर करत नव्हती. सोयाबीन सोंगण्याच्या काळात ज्ञानेश्वरी तब्बल पंधरा दिवस अन्नपाण्याविणा जिवंत होती. याने दिले असेल, त्याने दिले असेल असे झाल्याने शेतकरी वर्ग शेतात व्यस्त होता. –

ज्ञानेश्वरीच्या जीवनाचा दोर खूपच मजबूत होता. संध्याकाळी तिला जेऊ घालून शेजारणी आपआपल्या घरी गेल्या. खोलीतला झिरोचा बल्ब सुरु होता. दिवसभर पडून असल्याने ज्ञानेश्वरीला लगेच झोप लागत नसे. आपण नेमकं असं काय पाप केलं असेल? असा विचार ती करत असतांना तिच्या अंथरुणावर कशाची तरी सळसळ झाली. हतबल असलेली ज्ञानेश्वरी केवळ मान फिरवू शकत होती. तिच्या अंगावरुन एक भलामोठा नाग तिच्या उशाजवळ आला. सुरुवातीला तिला खूप भीती वाटली. नंतर मात्र आता या नरकयातनांमधून आपल्याला मुक्ती देण्यासाठीच या नागाला परमेश्वरानं पाठविलं आहे असं तिला वाटू लागलं. ती शांतपणे डोळे तिरपे करून त्याच्याकडे पहात होती. देवा या नागाला दंश करण्याची सुबुध्दी दे! अशी देवाची आळवणी ती करत होती. साप निर्धास्त बसलेला होता. संपूर्ण रात्र ती दोघे एकमेकांकडे पहात होते. सकाळी एका शेजाऱ्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृष्य पाहून तो हादरला. दारातून प्रकाश आत येताच साप हळूवार निघून गेला. शेजाऱ्यांना आता वेगळ्याच काळजीने घेरले होते. 

अशातच गावातल्या एका माणसाने डॉ. खेडेकर साहेबांकडे ज्ञानेश्वरीचा विषय काढला. डॉक्टरसाहेबांच्या भगिनी सौ. वैशालीताई चेके पाटील यांना ज्ञानेश्वरीची कथा ऐकून वाईट वाटले. सेवासंकल्प परिवाराच्या त्याही सदस्या आहेत. मुंबईला त्यांनी समाजभान असलेल्या मैत्रिणींचा एक छानसा गृप तयार केलेला आहे. वैशालीताई आणि त्यांच्या सहकारी असलेल्या सलीमादिदींनी सेवासंकल्प कार्याची डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी मनस्वी प्रयत्न केले. आज सेवा संकल्प प्रकल्पावर येणारे पाहूणे ही डॉक्युमेंट्री पाहून प्रभावित होतात. वैशालीताईंनी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात नंदूशी चर्चा करून तिच्याबाबतीत काही करता येईल का? असेही विचारले. गावातल्या काही प्रमुख  व्यक्तींची बैठक घेऊन काही कायदेशीर बाबी उद्भवल्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.

ज्ञानेश्वरीच्या घरात शिरताच ही मुलगी इतके वर्ष जिवंत राहिलीच कशी? हा प्रश्न सर्वात आधी मनात आला. नंदूने तिचा हात हातात घेऊन तिला आश्वस्त केलं. थोडावेळ हातात हात घेतल्यावर नंदून ज्ञानेश्वरीचा हात पुन्हा जागेवर हळूवार ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या हाताची त्वचा त्याच्या हाताला चिटकली होती. पाणी पिल्याने आपल्याला सतत लघवी होईल या भीतीने ती पाणी खूपच कमी प्यायची. त्यातूनच त्वचा कोरडी पडण्याचा प्रकार घडत होता. सगळं गांव ज्ञानेश्वरीच्या घरासमोर जमा झालं होतं. शेजाऱ्यांना अश्रू अनावर झालेले होते पण त्याचबरोबर आता यापुढे ज्ञानेश्वरीची काळजी घेणारे माणसं तिच्या अवती-भवती राहणार आहेत याचं समाधानही होतं.

अकोला येथील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर म्हैसने सरांच्या उपचारांना ज्ञानेश्वरी उत्तम प्रतिसाद देते आहे. ती जरी एकाच जागेवर पडून असली तरी ती अष्टावधानी आहे.  तिशीच्या आत असलेली ज्ञानेश्वरी खूपच चुणचुणीत होती. हसरा सुंदर चेहरा आणि त्यावर असलेला पूर्णपणे बरे होणार असा आत्मविश्वास ह्या तिच्या जमेच्या बाजू. प्रकल्पाच्या कानाकोपऱ्यावर लक्ष ठेऊन असलेल्या सी.सी.टि.व्ही कॅमेऱ्यांचे मॉनीटर तिच्या ताब्यात आहे. प्रकल्पावर आल्यानंतर काहीच दिवसात तिने सगळी माहिती मिळविली. नंदू-आरती किंवा आम्ही कोणीही प्रकल्पावर नसलो तरी येणाऱ्या पाहुण्यांना इत्यंभूत माहिती सांगण्याची जबाबदारी ती लिलया सांभाळत होती . प्रकल्पाचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे. बरेचदा काही गोष्टी एकमेकांना सांगण्याचं आम्ही विसरतो. अशा गोष्टी मात्र लक्षात ठेवून त्या संबंधीतांना सांगणे, प्रकल्पावरील मुलांवर लक्ष ठेवणे या आणि अशा कित्येक गोष्टी ज्ञानेश्वरी समरसून करत असे . तिला व्हिलचेअरवर बसवून प्रकल्पाच्या परिसरात हिंडविणारे संभाजी काळे मामा हे ज्ञानेश्वरीचे पप्पा आहेत. मामांना दोन लेकी असल्यातरी आजमितीस त्यांचं सगळं लक्ष आपल्या तिसऱ्यामुलीकडेच अर्थात ज्ञानेश्वरीकडेच अधिक असे .

 प्रेमात आणि सुखात न्हाऊन निघालेल्या ज्ञानेश्वरीला लवकर बरं होऊन सेवासंकल्प परिवाराचा एक सदस्य म्हणून काम करायचं होत.इथल्या माणसांची सेवा करायची होती .आरतीचं काम हलकं करायचं होत आणि हो !!! आपल्या बाळालाही प्रकल्पावर आणायचं होत , त्याला खूप-खूप शिकवायचं होत.

आणि आपल्या सारख्या वेदना झेलणाऱ्या , वस्तू समजून टाकून दिलेल्या समाजातील असंख्य  ज्ञानेश्वरीना सेवा संकल्प वर घेऊन यायचं होत आणि सांभाळायचं होत , स्वतः जागे वरून न हलू शकणारी ज्ञानेश्वरी कमीत कमी १००० स्त्रियांना वेदनेतून मुक्त करायची स्वप्न पाहत होती. आज ज्ञानेश्वरी आपल्या मधे नाही पण तिची हीच ऊर्जा ,सकारात्मकता आणि विचार सेवा संकल्प परिवाराला काम करण्याची शक्ती देत आहे , १००० स्त्रियांना वेदना मुक्त जीवन देण्याचं स्वप्न “ज्ञानेश्वरी अवेदना केंद्र ” च्या रूपाने मूर्त रूप प्राप्त करत आहें. 

 मित्रहो! एक तरी ओवी अनुभवावी असा संदेश देणारी ज्ञानेश्वरी आपण ऐकली असेल. आमच्या ज्ञानेश्वरीला भेटून तिची जगण्याची जिद्द, चिकाटी, सेवाभाव आणि जीवननिष्ठा एकदा तरी अनुभवायला प्रकल्पावर या असं प्रांजळपणे सांगावसं वाटतं.

English