सेवा संकल्पच्या ‘ज्ञानेश्वरी’ चे पसायदान..

संत ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीची निर्मिती केली व त्यातून पसायदानची विश्व प्रार्थना प्रसवली, त्यातून जो संदेश दिला आहे त्याचे मूर्तीमंत स्वरूप प्रत्यक्षात ज्ञानेश्वरीच्या रूपाने समोर यावे व सेवा संकल्पने डॉ. नंदुभाऊ पालवे व आरती पालवे यांनी तो जिवापाड जपावा. इतकेच नव्हेतर त्यांना कायमस्वरूपी अजरामर करावे हे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले. ‘सेवा संकल्पचे कार्य हे देवत्वाचे कार्य ठरत आहे’.

ज्ञानेश्वरी मानवी स्वरूपात प्रत्यक्षात बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा गावाजवळ एका खेडेगावात अतिशय असाह्य जीवन जगत होती. ज्ञानेश्वरीची भेट होईपर्यंत मानसाचा विश्वासच बसणार नाही, असे प्रत्यक्ष रूप समोर येत होते. मानसाचं लाकुड होण्यावर विश्वास नाही, मात्र ज्ञानेश्वरीला पाहिल्यानंतर मानसाचं शरीर लाकडासारखं होवू शकतं. माणूस एखाद्या ओंडक्यासारखा एकाच जागेवर पडून राहणे हे प्रत्यक्ष डॉ. नंदुभाऊ व आरती व त्यांचे साक्षीदार पाहत होते. त्यात ८ वर्षापासून ज्ञानेश्वरी एकाच जागेवर निश्चल, हतबल पडलेली होती.

तिशीच्या आत असलेली ज्ञानेश्वरी खुपच चुणचुणीत, हसरा-सुंदर चेहरा आणि त्यावर असलेला पुर्णपणे बरे होणार असा आत्मविश्वास. तो खऱ्याअर्थाने सेवा संकल्पमध्ये दाखल झाल्यानंतर मिळालेल्या पाठबळावर साकारल्या गेला नाही का!

ज्ञानेश्वरीची आई त्या वारल्यानंतर ती वयात येताच तिच्या वडीलांनी तिचं लग्न करून दिलं. तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या वडीलांनीही लग्न केलं. ज्ञानेश्वरीच्या लग्नानंतर वर्षभरातच गोंडस मुलाला जन्म दिला. आपल्या मुलाच्या बाललिलांचा आनंद घेण्याचं भाग्य तिला लाभलं नाही. मुल वाढत होतं आणि ज्ञानेश्वरीचं दुखनंही.

सुरूवातीला होणाऱ्या त्रासाला न जुमानता ती संसार रेटत होती. तिच्या पायातील शक्ती क्षिण झाली. पाहता पाहता तिच्या मानेवरचा खालचा भाग बधीर झाला. तिला शरीराची वाटचाल करणे ही कठीण होत होते. कोणी तिला हालचाल करण्यास मदत केली तर तिला वेदना होत होत्या. घरच्या गरीबीने उपचार करणे दुरापास्त होते. ज्ञानेश्वरीची अवस्था पाहून तिच्या पाठीशी उभे राहण्याचं सोडून तिचा नवरा तिलाच सोडून गेला. म्हातारे सासू-सासरे नातवाला घेवून गाव सोडून निघून गेले. शेवटी छोट्याशा घरात एकाकी राहिली ज्ञानेश्वरी.

छोट्याशा गावात व छोट्याशा घरात तिची किव यायची, पण त्यालाही मर्यादा होत्या. एकवेळ खायला-प्यायला कोणी देईल पण तिच्या स्वच्छतेचे काय ? या ज्ञानेश्वरीला जीव नकोसा वाटायचा. हातात अगदी थोडसं बळ असतांना तिनं आजू-बाजूला पडलेल्या गोष्टी तोंडात टाकायला सुरूवात केली होती. कदाचित एखाद विषारी, किडा किटकूल आपण खावू आणि मरून जावू असा विचार तिच्या मनात येत होता. काही शेजारी मोठ्या हिमतीने तिची स्वच्छताही करायचे. पण ज्ञानेश्वरीची अवस्था बिकट व्हायची. त्यामुळे अनेक दिवस ती काहीच खात नसे तर कधीकधी दोन-दोन दिवस शारिरीक विधीही करत नसे. उपाशी-तापाशी निश्चल, निराशी अवस्थेत ती जीवन कंठीत होती. एकीकडे ज्ञानेश्वरी दररोज मरन यातना सोसत मरनाची वाट पाहत होती. काळ मात्र तिला नेत नव्हता. ग्रामीण भागात पिक सोंगण्याच्या हंगामात ज्ञानेश्वरी तब्बल १५ दिवस अन्न-पाण्याविना जिवंत होती. तिच्या जिवनाचा दोर खुपच मजबूत होता नव्हेतर सेवा संकल्पचा सेवाभावाचा ज्ञानेश्वरी दोर ओसाड गावचे रहिवाशी तर गुंफायचा तर नव्हता ना….

एकेदिवशी संध्याकाळी तिला जेऊ घालून शेजारणी आपआपल्या घरी गेल्या. नंतर रात्री अंधूक प्रकाशात तिच्या अंगावरून एक भलामोठा नाग तिच्या उशाजवळ आला. तिला भितीही वाटली असेल, परंतु ती काहीच करू शकत नव्हती. नव्हेतर ती देवा या नागाला दंश करण्याची सुबुध्दी दे! अशी देवाची आळवणी तर करत नसावी ना? सकाळी एका शेजाऱ्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृष्य पाहून तो हादरला. दारातून प्रकाश येताच नाग हळूवार निघून गेला. तर शेजाऱ्यांना आता ते वेगळ्याच काळजीने घेरलं होतं.

ज्ञानेश्वरीची अशीही कथा व व्यथा गावातल्या एका मानसाने डॉ. खेडेकर यांच्याकडे ज्ञानेश्वरीचा विषय काढला. त्यांच्या भगिनी सौ. वैशालीताई चेके पाटील यांना कळला व त्यांना अतिशय दुःख झालं. त्याही सेवासंकल्पच्या सदस्या आहेत. त्यांनी मुंबईला समाजभान असलेल्या मैत्रीणीचा एक छानशा छोटासा ग्रुप बनविला आहे. त्यांच्या सहकारी असलेल्या सलिमा दिदींनी ‘सेवा संकल्प’ च्या कार्याची सुंदर डाक्युमेंट्री खूप कष्टाने तयार केली आहे. सेवा संकल्प प्रकल्पावर येणारे ती पाहून प्रभावित होतात. तेव्हा वैशालीताईंनी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात नंदुभाऊंशी चर्चा करून काही करता येईल का? याबाबत चर्चा केली. काही गावातील प्रमुख लोकांशी तसेच काही अडचणी निर्माण झाल्यास सहकार्य करण्याची तयारीही दर्शविली.

ज्ञानेश्वरीच्या घरात शिरताच ती इतके वर्ष जिवंत राहिलीच कशी? असाच प्रश्न उपस्थित सर्वांच्या मनात आला. नंदुने तिचा हात हातात घेवून तिला धिर दिला. हातात हात घेतल्यानंतर नंदुने तिचा हात पुन्हा जागेवर हळूवार ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या हाताची त्वचा त्याच्या हाताला चिटकली होती. पाणी पिल्याने आपल्याला सतत लघवी होईल या भितीने ती पाणी खुपच कमी प्यायची. त्यातून त्वचा कोरडी पडण्याचा प्रकार घडत होता. तेव्हा ज्ञानेश्वरीच्या घरासमोर संपूर्ण गाव जमा झालं होतं. सारेच भाऊक झाले होते. नंदुभाऊंनी सेवा संकल्पच्या टिमसोबत ज्ञानेश्वरीला घेवून सेवा संकल्पवर आणून तिची काळजी घेणारे माणसंही उभी केली होती.

अकोला येथील आयुर्वेद तज्ञ डॉ. म्हैसने यांच्या उपचारांना ती चांगला प्रतिसाद देत होती. ती जरी एकाच जागेवर पडून असली तरी ती सुंदर, हसमुख चेहरा व अष्टावधानी होती. सेवा संकल्प प्रकल्पावर दाखल होताच तिने सगळी माहिती मिळविली व ती प्रकल्पाचा चालता-बोलता, हसरा आरसा झाली होती. एकतरी ओवी अनुभवावी असा संदेश देणारी ज्ञानेश्वरी आपण ऐकली असेल. पण ती सेवा संकल्प वरील ज्ञानेश्वरी त्या संदेशाची प्रचितीच देत होती 

 तिची ती व्यथा, कथा, तिची जिद्द, चिकाटी, सेवाभाव आणि जीवन निष्ठा ही खरेतर 

‘सरली रात्र काळी, आता नवी सकाळ आहे..

पुसल्या दुर्भाग्य रेषा, तेजस्वी माझे भाळ आहे.

छळले जगाने मला, तो एक काळ होता…

माणुसकीच्या तज्ञहाती आज माझा सांभाळ आहे.’ हा संदेश तर देत नाही का?

७ ऑक्टोबर २०१२ रोजी डॉ. नंदुभाऊ व सौ. आरती यांनी आपल्या साथीदारांसमवेत सेवा संकल्पची मुहूर्तमेढ रोवली व ज्याच्या दातृत्वशक्तीने ती साकारली गेली तेही श्री. ज्ञानेश्वर पालवे (नंदुभाऊंचे वडील) व  संभाजी काळे (मामा, सौ. आरतीचे वडील)ज्ञानेश्वरीला मुली प्रमाणेच  सांभाळत होते . सेवा संकल्पवर ज्ञानेश्वरी ३ वर्ष राहिली. मेंदूमध्ये झालेल्या असाध्य गाठीमुळे तब्बल १० ते १२ वर्षे ती अंथरुनाला खिळून होती. अनेकदा आत्महत्येचा विचारही तिच्या मनात आले. मात्र दोन्ही हात व पाय हलत नसल्यामुळे ती स्वतःचा जिवही घेवू शकत नव्हती. अशी तिची अवस्था होती. आजू-बाजूला सर्व नकारात्मक वातावरण, बालवयात झालेला विवाह, त्यातच पॅरालिसीसचा आलेला अटॅक यामुळे आपले जीवन आपल्याला एकाच खाटेवर काढावे लागेल याची तिला जाणिव होती. अशाही अवस्थेत ती नियतीशी झगडत राहिली.

तिला सेवासंकल्पवर डॉ. नंदुभाऊ व आरतीने दाखल करून घेतल्या पासून प्रकल्पावर सर्वच तिला जिवापाड जोपासत , तिची सेवा करत. त्यांच्या या प्रेमानेच  तिचा माणुसकीवर विश्वास परतत होता व असाध्य अशा अवस्थेत नियतिशी हसतमुखाने झगडत राहायला प्रेरणा देत होता.मरणप्राय वेदनांतून झालेल्या प्रवासाने तिच्या जाणीव व संवेदना ओसंडून वाहात होत्या या सहवेदनेत परिवर्तित झाल्या होत्या , ती तिच्या सारख्या असंख्य ज्ञानेश्वरीची चिंता करू लागली ज्यांना नंदू बाबा आणि आरती आई नाही भेटले. 

  मी कधीतरी माझ्या पायावर उभी राहील आणि  माझ्यासारख्या एका जागी पडलेल्या अनेक माता-भगिणींचा मी आधार बनेल व त्यांच्या वेदना कमी करेल हा तिचा निर्धार होता व मी आणि माझा सेवा संकल्प चा परिवार हे स्वप्न पूर्ण कारणार हा विश्वास होता.

तिच्या या निर्धारातच तिच देवत्व प्रकट झाल होत. म्हणून सुचत 

“प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।

क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥ “

प्रचंड वेदना असूनही सतत हसतमुख असलेली ज्ञानेश्वरी समस्त सेवासंकल्पला काम करण्यासाठी प्रेरणा देणारी शक्ती होती. सेवा संकल्पची ज्ञानेश्वरी ५ मे २०२१ रोजी आपल्यातून निघून गेली. तिच्या या असहाय्य वेदनातून तिची सुटका झाली. अवघे सेवा संकल्प हळहळले. तिच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या निर्धाराला मूर्तरूप देण्यासाठी तिच्या सारख्याच एकाजागी पडून वेदनेत आयुष्य घालवणाऱ्या माता-भगिणींसाठी तिथे त्या वेदनारहीत व समाधानाने जगतील अशा ‘ज्ञानेश्वरी अवेदना’ केंद्राची निर्मिती करण्याचा सेवा संकल्पने निर्धार केला व त्याला तिच्या प्रथम स्मृतीदिनीच त्याचे भूमिपुजन करून तो आकारला आहे.

अवेदना केंद्र म्हणजे जिथे कोणतीही वेदना नाही , कोणतीही भिती नाही ,कोणतीही काळजी नाही. आहे तर फक्त प्रेम आणि सन्मान. 

आमच्या ज्ञानेश्वरीला व तिच्या विचारांना कायम अनुभवण्याचा एक उपाय. 

सेवा संकल्पच्या निस्सीम सेवेचे कल्पतरू असलेले पु. ह. भ. प. संजय महाराज पाचपोर (रामायनाचार्य) यांच्या प्रेरणेतून डॉ. नंदुभाऊ व आरती आपल्या साथीदारांसमवेत २०० च्या वर बेसहारा, मनोरून, दुर्धर रोगाने त्रस्त अशा रुग्णांना सांभाळत आहेत. म्हणून प. पू. ह.भ.प. इंदोरीकर महाराज म्हणाले होते की ‘जगात देव आहे की नाही या वादात न पडता अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य फक्त देवाजवळ असते व असेच अशक्य कार्य सेवासंकल्पच्या माध्यमातून होत असून समाजाने नाकारलेल्या तसेच मरणासन्न अवस्थेत सोडून दिलेल्या मनोरुग्णांना जिवन देण्याचे कार्य येथे होत असल्याने ते देवत्वाचे कार्य आहे’. असे गौरवोद्गार काढले होते.

ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरीतून पसायदानाची विश्वप्रार्थना प्रसवली व त्यातून मानवकल्याणाची प्रकाश किरणे प्रज्वलीत झाली. त्याचे मूर्तीमंत पालन करीत सेवा संकल्पच्या ज्ञानेश्वरीचे पुण्यस्मृती ‘ज्ञानेश्वरी अवेदना केंद्र’ द्वारे कायमस्वरूपी समाजसेवेत कार्यरत होत आहे.

ज्ञानेश्वरीच्या वेदना व ज्ञानेश्वरीतील ओवी, पसायदानची प्रार्थना याचा कायम स्वरूपी सेवा संकल्पचा हा प्रकल्प म्हणजेच 

‘बेचतो क्षण सुखाचे, पंखात बळ आहे..

हेच माझे मुक्तांगण, हेच माझे आभाळ आहे’!!

मराठी