ज्यांच्यामुळे सेवासंकल्पची संकल्पना रुजली, ज्यांच्यामुळे प्रकल्पाला सुरुवात झाली त्या माऊलींचा विषय सातत्याने चर्चिल्या जातो. सेवासंकल्प प्रकल्प जोवर अस्तित्वात आहे तोवर माऊलींचं अस्तित्वही टिकणार आहे हे निर्विवाद सत्य. तसे सुरुवातीपासून हे व्यक्तिमत्व आमच्यासाठी विशेष होतं. आमच्याशी अनेक मनोरुग्णांनी संवाद साधला. ते कधी अर्थपूर्ण बोलले तर कधी असंबध्द पण तरी ते किमान बोलत असत. माऊलींना बोलतांना आम्ही बघितल नव्हतं. नंदु-आरतीच्या कॉलेज जीवनापासून ते प्रकल्पावर येईपर्यंत आणि त्यानंतरही अनेक महिने माऊली आमच्याशी कधी बोलले नाही.

एकदिवस काही कामानिमित्त काही सहकाऱ्यांसोबत पुरुष कक्षात नंदू बोलत असतांना उपरती झाल्यासारखे माऊली त्याच्या पुढ्यात उभे राहिले. बांधकामाचे काही साहित्य आणायचे होते. आम्ही हातात कागद पेन घेऊन उभे होतो. नंदूच्या हातातील कागद व पेन पाहून माऊली म्हणाले, घ्या लिहून् ! माऊली बोलल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला. माऊलींनी आपलं नांव, गांव पत्ता सर्वकाही सांगितलं. माऊली पहिल्यांदाच काहीतरी सांगत असल्याने आम्ही ते गांभिर्याने लिहून घेतले. योगायोगाने माऊलींनी सांगितलेल्या गांवाला आमच्या मित्राची सासुरवाडी होती. त्याला फोन करून माऊलींनी सांगितलेल्या गोष्टीची शहानिशा केली आणि माऊली खरे बोलत आहेत हे लक्षात आले.

आम्ही माऊलीच्या घरात बसलो होतो. माऊलीच्या पत्नीचे डोळे डबडबलेले होते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून जी बाई आपल्या नवऱ्याचे श्राध्द घालत होती तो नवरा जिवंत असल्याचे ऐकून तिला धक्का बसला होता. आपला नवरा चांगल्या माणसांच्या संपर्कात आहे हे ऐकून तिला बरं वाटलं. माऊलीची मुलं तरणीबांड झालेली होती. आपला बाप मेलेला नाही तो जिवंत आहे हे ऐकून त्यांचा कानावर विश्वास बसत नव्हता. सगळं काही आलबेल सुरु असतांना एका कुटुंबात आपण विनाकारण वादळ निर्माण केल्याची आम्हाला खंत वाटत होती. कदाचित ही माणसं सुखावतील आणि आपलं माणूस पुन्हा घरी परतावं असा असा आम्हाला आग्रह करतील असं वाटत असतांना परिस्थिती काही वेगळंच सांगत होती. माऊली निघून गेल्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. सर्व आशा सोडून, दुःख बाजूला ठेवून ही माणसं जगायला शिकली होती. माऊलीला परत आणूच नका. आता पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही. आम्ही मोठ्या कष्टानं पंचवीस वर्षांपूर्वी मोडलेली चौकट पुन्हा जोडली आहे तिला जराही धक्का लागला तरी ती पुन्हा जोडल्या जाणार नाही. माऊलीच्या कुटुंबाने त्यांची अपरिहार्यता आणि अगतिकता समोर मांडली होती. माऊलीही आता कुंटुंबाला पार विसरलेले होते. त्यांच्या कल्पनेतले चेहरे केव्हाच भूतकाळाच्या गर्तेत हरवले होते. आजही माऊलीच्या घरची मंडळी माऊलींचं श्राध्द करतात म्हणे. त्यांच्यासाठी माऊली मेले आहेत आणि इकडे सर्वस्व हरवलेले माऊली एक जिंदालाश बनले आहेत. स्वतःच्या घरापासून दुरावलेल्या, बेघर झालेल्या माऊलींना आपण हक्काचं घर देऊ शकलो याचं आम्हाला समाधान आहे. ह्याच माऊलींकडे पाहून प्रकल्पाची संकल्पना सुचली, ते या प्रकल्पाचे पहिले सदस्य आहेत. त्यामुळे जेव्हा-जेव्हा प्रकल्पाचा विषय येतो त्यावेळी माऊली डोळ्यासमोर येतात आणि भविष्यातही ते येत राहतील हेही तितकेच खरे. ज्यांच्यामुळे पाया रचल्या गेला त्यांच्याच कथेने कार्याचा कळस चढतो आहे.

मराठी